सातारा : राज्यसभा निवडणुकांनंतर खासदारकीची शपथ घेतल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आजारी होते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमातूनही दूर होते. मात्र, आज साताऱ्यातील कार्यक्रमातून त्यांच्या जोमाने कामाची नव्याने सुरुवात झाली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा वर्णी लागली असून सन 2026 ते 2029 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी शरद पवार हेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी रयत शिक्षण संस्थेतील कार्यक्रमास हजेरी लावत भाषण केलं.
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान अध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, आपण कुठं कमी पडलो, नवीन काय करता येईल याबाबत आपण विचार करायला हवा. सर्वसामान्य लोकांसाठी कर्मवीरांनी आदर्श दिला, तोच आदर्श आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. संस्थेसाठी अखंड काम करणारे आहेत, म्हणून आज संस्थेची उंची वाढली आहे. सर्व सेवकांचे मी अंतःकरणापासून आभार मानतो, असे म्हणत शरद पवारांनी पुन्हा एकदा रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर भाषण केलं.
आधीच्या बैठकीत मी आग्रह केला होता, जग बदलत आहे. नवी संकल्पना जगान स्वीकारली आहे, आपण देखील ती स्वीकारायला हवी. AI स्वीकारून रयत संस्था जगाबरोबर न्यायला पाहिजे. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृती मोठ्या प्रमाणात देणार आहोत. हितचिंतकांकडून संस्थेला मोठी देणगी मिळाली आहे, त्याचे आम्ही आभार मानतो. संस्थेत नवीन काही करण्यासाठी चर्चा झाली आहे. परदेशात ज्या संस्था आहेत, त्याच्यासोबत रयत जोडून मुला-मुलींच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न आहे, असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटले.
खेडेगावातील मुले AI बाबत बोलतात याचा आनंद
कर्मवीर अण्णांनी अतिशय कष्टाने दूरदृष्टी ठेऊन गोरगरीब मुला मुलींना ध्यानाचे दरवाजे खुले व्हावेत यासाठी काम केलं. संस्थेच्या माध्यमातून खेडेगावतील मुलं मुली आज AI बाबत बोलायला लागली, चर्चा करायला लागली ही जमेची आणि कौतुकाची बाब आहे. रामशेठ ठाकूर हे दरवर्षी संस्थेला मदत देत असतात, यावर्षी 3 कोटींपेक्षा जास्त निधी त्यांनी दिला आहे. आता, नव्या पीढीपुढे, रयत सेवकांपर्यंत चांगल्या कामाचा कसा आदर्श राहील यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही शरद पवारांनी म्हटले.